अकबर व चतुर बिरबल मराठी गोष्टी - Akbar Birbal Story in Marathi
अकबर बिरबल च्या गोष्टी : जेव्हाही बुद्धिमत्ता, चातुर्य आणि हजरजबाबीपणा ची गोष्ट केली जाते, तेव्हा अकबरच्या दरबारात असलेल्या नवरत्नांपैकी एक बिरबल यांचे नाव घेतले जाते. आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी Akbar Birbal story in Marathi घेऊन आलो आहे.
या लेखातील अकबर व चतुर बिरबल यांच्या मराठी गोष्टी तुम्हाला हसवतील व त्या सोबत उत्कृष्ट बोधही देतील. बिरबल याने आपली बुद्धिमत्ता आणि चातुर्याच्या बळावर दरबारातील अनेक अवघड प्रकरणे सोडवली आहेत.
अकबर बिरबल मराठी गोष्टी जरी अनेक शतके जुन्या असल्या तरीही वर्तमानात यांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. जे पालक आपल्या मुलांना मानसिक रूपाने मजबूत बनवू इच्छिता त्यांनी या गोष्टी आपल्या मुलांना सांगायला हव्यात. तर चला अकबर बिरबल च्या गोष्टी (Akbar Birbal story in Marathi) सुरू करुया...
अकबर बिरबल कथा मराठी | akbar birbal story in marathi
1) उंचावरील खिचडी | Akbar birbal khichdi story in marathi
अंग गोठवणाऱ्या थंडीच्या दिवसात एका तलावाजवळून सकाळी फिरत असताना अकबर बादशहा बिरबलाकडे पाहून म्हणाला, "बिरबल, अशा या जीवघेण्या थंडीत एखादा माणूस फक्त 100 मोहरांसाठी, एक संपूर्ण रात्र स्वतःला थंड पाण्याच्या तलावात बुडवून ठेवेल का?
बिरबल म्हणाला, "महाराज अतिशय गरिबीने गांजलेला काटक मनुष्य हे दिव्य करून दाखविल," नंतर संध्याकाळ पर्यंत बिरबल ने असा एक माणूस शोधून राजवाड्यावर आणला. बादशाह त्याला म्हणाला, " हे बघ, कसल्याही प्रकारची ऊब न घेता अंग उघडे ठेवून, गळ्यापर्यंत बुडालेल्या अवस्थेत संपूर्ण रात्र त्या तलावात काढायची आहे. जर तू कोणतीही फसवणूक न करता हे कार्य केले तर तुला 100 मोहरा देण्यात येतील.
बादशहाची ती अट त्या गरजवंत इसमाने मान्य केली. व बादशाह ने ठेवलेल्या शिपायांच्या पाहऱ्यात तलावातील त्या थंड पाण्यात संपूर्ण रात्र काढून दाखवली.
दुसऱ्यादिवशी आता आपल्याला इनाम मिळेल या आशेने तो राजवाड्यावर पोहोचला. तेव्हा बादशहाने त्याला विचारले, "अशा बर्फासारखे थंड पाण्यात एवढ्या थंडीत तू संपूर्ण रात्र कशी काढलीस?" तेव्हा तो इसम म्हणाला, "हुजुर, आपल्या राजवाड्यातील सर्वात वरच्या मजल्यावर एक दिवा होता. त्या दिव्याकडे टक लावून पाहत मी कशीबशी रात्र काढली."
त्याचे हे बोलणे ऐकून दरबारातील बादशहाचा एक शिपाई म्हणाला, "हूजुर, त्या तलावापासून आपला राजवाडा जरी अर्ध्या तासाच्या अंतरावर असला तरीही सतत टक लावून वरच्या मजल्यावरील दिव्याकडे पाहिल्याने त्या दिव्याची थोडीफार का होईना उष्णता याला मिळाली असेल; आणि याचाच अर्थ की याने कसली ही ऊब न घेण्याची अट मोडली आहे. म्हणून ह्याला शंभर सुवर्ण मोहरा देऊ नका. बादशहाने शिपायाचे बोलणे मान्य करून त्या इसमाला दरबारातून बाहेर काढून दिले. दुःखी झालेला बिचारा इसम बिरबलाकडे आला. "मी तुला तुझे इनाम मिळवून देईन." असा बिरबलाने त्याला धीर दिला.
या घटनेच्या दुसर्या दिवशी बिरबल दरबारात आला नाही, म्हणून बादशहाने त्याच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा दरबारातील एक जण हसत म्हणाला, "हुजूर, आपल्या लाडक्या बिरबलाला वेड लागलंय, यमुनेच्या वाळवंटात साधारण वीस हात उंचीचे तीन बांबू त्यांनी जवळ जवळ रोवलेत व त्या बांबूंच्या वरचे टोक एकत्र बांधून धान्याने भरलेली हंडी खिचडी तयार करण्यासाठी वर टांगून खाली गवताची एक लहानशी शेकोटी पेटवली आहे.
हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी अकबर बादशाह स्वतः बिरबलाकडे आला. त्याला म्हणाला, "बिरबल, तू एवढा बुद्धिमान असताना तुझ्या डोक्यात हे खुळ कसे काय शिरले? तळाशी पेटवलेल्या या लहानश्या शेकोटीची ऊब वीस हात उंचावर टांगलेल्या त्या खिचडीच्या हंड्याला लागणे कसे शक्य आहे?
यावर बिरबल म्हणाला, "यात काय अशक्य? जर आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरच्या लहानशा दिव्याची ज्योत अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या व्यक्तीला ऊब देऊ शकते, तर शेकोटीची धग फक्त वीस हात उंचीवरच्या खिचडीच्या हंडीला का लागणार नाही?"
बिरबलाचे उत्तर ऐकून बादशहाच्या डोक्यात प्रकाश पडला. व दुसऱ्या दिवशी त्याने तलावात रात्र काढणाऱ्या त्या इसमाला बोलवून शंभर ऐवजी दोनशे सुवर्ण मोहोरा इनाम दिल्या.
***
2) प्राण्याला सर्वात प्रिय काय ? Akbar Birbal story in Marathi
एकदा बादशहाने दरबारी मंडळींना प्रश्न केला की, "या जगात प्राणिमात्राला सर्वात अधिक प्रिय काय असेल?"
या प्रश्नावर बहुतेक सर्वजण म्हणाले, "आपले मूल."परंतु बिरबल म्हणाला, "महाराज, या जगात प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो."
बिरबलाच्या या उत्तराला बादशहाने सिद्ध करून दाखवायला सांगितले. यानंतर बिरबलाने एका रिकाम्या हौदाच्या मध्यावर त्या हौदाच्या एकूण उंचीपेक्षा थोडा कमी उंचीचा खांब रोवला. यानंतर त्या हौदात एका वानरीला तिच्या पिल्लासह सोडण्यात आले. इतके झाल्यावर बादशहा व इतर दरबारी मंडळींना, त्या हौदा जवळ नेऊन बिरबल ने हौदात पाणी सोडणे सुरू केले.
जसं जसे हौदात पाणी वाढायला लागले तसे ती वानरी आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून खांबावर चढू लागली. खांब शेंड्यापर्यंत बुडताचा आपले पिल्लू डोक्यावर घेऊन ती वानरी खांब्यावर उभी राहिली. परंतु नंतर ते पाणी आणखी वर चढू लागले आणि वानरीच्या गळ्याला लागले. तेव्हा मात्र आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिल्लाला खाब्याच्या शेंड्यावर ठेवून ती त्या पिल्लावर उभी राहिली, व आपले प्राण वाचविण्याचा प्रयत्न करू लागली.
असा प्रकार पाहताच बिरबल बादशहाला म्हणाला, "महाराज, या जगामध्ये प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो, हे माझे म्हणणे आता तरी तुम्हाला पटले ना? आपल्या प्राणांची पर्वा न करता मुलाचे प्राण वाचवणारे आईबाप ही असतात, पण ते अगदी अपवादाने."
बादशहाने बिरबलचे म्हणणे मान्य करताच, बिरबलाच्या हुकुमावरून सेवकाने नाकातोंडात पाणी गेलेल्या वानरी च्या पिल्लाला बाहेर काढले.
***
3) चतुर बिरबलाची बिनतोड उत्तरे - Birbal story in Marathi
एका पाठोपाठ दुसरा असे पाच प्रश्न एकदा बादशहाने दरबारातील मंडळींना विचारले. बिरबल वगळता सर्व मंडळींनी गुळमुळीत उत्तर दिली, पण बिरबलाने मात्र अगदी बिनतोड उत्तर दिले.
प्रश्न पहिला
बादशाह: सर्वात श्रेष्ठ फुल कोणत्या झाडाचे आहे?
इतर मंडळी: गुलाबाचे.
बिरबल: कपाशीचे, कारण त्या फुलावरील बोंडातून कापूस तयार होतो. त्या कापसापासून आपल्याला कपडे चोपडे मिळून, आपल्या शरीराचे उन व थंडीपासून रक्षण होते.
प्रश्न दूसरा
बादशाह: सर्वश्रेष्ठ दात कोणाचा?
इतर मंडळी: हत्तीचा
बिरबल: नांगराचा, कारण त्याच्यामुळे शेतीची नांगरणी होते. त्यातूनच धान्य पिकते.
प्रश्न तिसरा
बादशाह: सर्वश्रेष्ठ पुत्र कोणाचा?
इतर मंडळी: राजाचा
बिरबल: गाईचा, कारण तो शेत नांगरतो, बैलगाडी ओढतो, जळण आणि खत देतो, एवढेच नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चामड्या पासून अनेक गोष्टी बनवल्या जातात.
प्रश्न चौथा
बादशहा: सर्वश्रेष्ठ राजा कोणता?
इतर मंडळी: सार्वभौम राजा व अकबर बादशाह
बिरबल: मेघ राजा, कारण तो आपणास पाणी देतो. शेती फेकून आपणास अन्न मिळते.
प्रश्न पाचवा
बादशाह: सर्वश्रेष्ठ गुण कोणता?
इतर मंडळी: विद्येची आवड
बिरबल: धैर्य, कारण धैर्यामुळेच माणसाला त्याच्या अंगातील सर्व गुणांचा पुरेपूर उपयोग करून जीवनाचे सार्थक करता येते.
बिरबलाची अशी सर्वश्रेष्ठ उत्तरे ऐकून बादशहा खुश झाला व त्याने दरबारातील सर्व मंडळी समोर चतुर बिरबलची पाठ थोपटली.
***
***
तर मित्रहो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत अकबर बिरबल च्या गोष्टी मध्ये काही उत्तम कथा - Akbar Birbal story in Marathi शेअर केल्यात. या कथा आपण आपल्या लहान मुलांना सांगून त्यांना योग्य बोध देऊ शकतात.
अकबर आणि बिरबल (Akbar Birbal story in Marathi) या दोघांच्या आणि खासकरून बिरबल च्या गोष्टी म्हणून प्रसिद्ध असलेले हे प्रसंग संपूर्ण भारतात सांगितले जातात. आपणास या अकबर बिरबल च्या बोधकथा कश्या वाटल्या कमेन्ट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद..
EmoticonEmoticon